गडचिरोलीविदर्भ

कुनघाडा (रै.) येथे भीषण अपघातानंतर जनक्षोभ; संतप्त नागरिकांचा महामार्गावर ‘चक्काजाम’!

रस्त्यावरील अवैध पार्किंगमुळे अपघात घडल्याचा आरोप ; बॅरिकेट्स लावण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक

गडचिरोली : चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुनघाडा रै. बस थांब्याजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताच्या निषेधार्थ ०२ जानेवारी रोजी संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून ‘चक्काजाम’ आंदोलन केले. भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि रस्त्यावरील जीवघेणी अवैध पार्किंग हटवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

गुरुवारी (दि. १) दुपारी १२ वाजताच्या सुमारास अतुल तुळशीराम कोसमशिले (४२) आणि संतोष सुधाकर भांडेकर (३८) हे दोघे दुचाकीने कुनघाडावरून चामोर्शीकडे जात होते. दरम्यान, चामोर्शीकडून गडचिरोलीकडे अत्यंत भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अतुल कोसमशिले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दुचाकीवरील दुसरे स्वार संतोष भांडेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

कुनघाडा बस थांब्याजवळ असलेल्या बिस्वास यांच्या मालकीच्या ढाब्यासमोर दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहने (ट्रक्स) उभी केली जातात. या अवैध पार्किंगमुळे मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने दिसत नाहीत (ब्लॅक स्पॉट), परिणामी येथे वारंवार अपघात घडत आहेत. “चामोर्शी पोलिसांनी यापूर्वी ढाबा मालकास लेखी सूचना दिल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. या बेजबाबदारपणामुळेच आज आमच्या गावचा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळी नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त कुटुंबाला त्वरित न्याय आणि मदत मिळावी. ढाब्याजवळील अवैध पार्किंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. रस्ता ओलांडताना सुरक्षितता राहावी यासाठी तातडीने बॅरिकेट्स लावण्यात यावेत. या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

आंदोलनामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत पोलीस आणि महसूल प्रशासन ठोस आश्वासन देऊन बॅरिकेट्स लावत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. “प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button