
“आपला जिल्हा… आपला उत्सव” अंतर्गत नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सचे सादरीकरण; नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित “गडचिरोली महोत्सव २०२५” हा केवळ एक सांस्कृतिक सोहळा न ठरता, तो स्थानिक उद्योजकतेचा गौरव करणारा मंच ठरला आहे. २५ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान कृषी महाविद्यालय मैदानात पार पडलेल्या या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ (TRICEF) इन्क्युबेशन सेंटरने आपल्या स्टार्टअप्ससह सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
“आपला जिल्हा… आपला उत्सव” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात ट्रायसेफ अंतर्गत इन्क्युबेट झालेल्या विविध स्टार्टअप्सनी आपले स्टॉल्स लावले होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील तरुणांनी विकसित केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा पाहून नागरिक थक्क झाले. महोत्सवाच्या तिन्ही दिवशी या स्टॉल्सवर नागरिकांची मोठी गर्दी होती. नागरिकांनी केवळ उत्पादने खरेदी केली नाहीत, तर स्टार्टअप्सच्या तरुण उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या. स्थानिक संसाधनांचा वापर करून तयार केलेल्या उत्पादनांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
हा यशस्वी सहभाग ट्रायसेफ इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी वृषांक सोरते यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. तसेच, प्रशासकीय सहाय्यक पंकज गहाणे आणि विविध स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींनी महोत्सवात आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली.
गडचिरोली महोत्सवाने जिल्ह्याच्या संस्कृतीसोबतच येथील ‘ब्रँड’ जगासमोर आणण्याचे काम केले आहे. ट्रायसेफच्या या सहभागामुळे गडचिरोलीतील नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, जिल्ह्यातील उद्योजकतेला यामुळे नवी ऊर्जा आणि दिशा मिळाल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.
“स्थानिक तरुणांमधील उद्योजकतेला बळ देणे आणि त्यांच्या संकल्पनांना बाजारपेठ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली महोत्सवातील नागरिकांचा प्रतिसाद आमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.” > — ट्रायसेफ इन्क्युबेशन सेंटर, गोंडवाना विद्यापीठ.



