आरोग्यगोंदियाविदर्भ

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम बालकांसाठी ठरतोय सुरक्षा कवच

51 बालकांची हृदय शस्त्रक्रिया व इतर 426 मुलांची मोफत शस्त्रक्रिया करुन दिले सुरक्षा कवच - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे

21 आरबीएसके पथकाद्वारे 1902 अंगणवाडीतील 97942 बालकांची तपासणी, 1408 शाळेतील 155378 मुलांची तपासणी

गोंदिया : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय अंतर्गत तब्बल 21 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक कार्यरत असुन जिल्ह्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास 1,55,378 मुलांची तपासणी करण्यात आली आहे. अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून २ वेळेस होणारी आरोग्य तपासणी हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा घटक असुन जवळपास 97942 बालकांची तपासणी करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होत असल्याची माहीती डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली.

जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एकूण 21 पथके मंजुर करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात १ वाहन, 1 वैद्यकीय अधिकारी स्त्री व 1 वैद्यकीय अधिकारी पुरुष, १ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम, तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली आहेत. सदर पथकाचे मुख्यालय ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे शाळा व अंगणवाडीनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात येत असते.

सदरची आरोग्य तपासणी पथकांकडून शाळा व अंगणवाडींना भेटी देवून तेथील बालकांची डोक्यापासुन पायाच्या अंगठा म्हणजेच Head to Toe तपासणी करण्यात येते. सदर आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या/अडचणीसाठी योग्य ते संदर्भ सेवा तसेच वैद्यकिय व शल्य चिकित्सक उपचार पुरविण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया या पूर्णतः मोफत करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने हृदय शस्त्रक्रिया (ASD device closure, VSD device closure, PDA device closure, total correction of TOF, PDA stenting, Surgical Correction of TAPVC आणि Mitral valve replacement इ.) व इतर शस्त्रक्रिया (Cleft Lip and Cleft Palate, Talipes, Congenital Cataract,Vision Impairment (Strabismus), Otitis Media, Dental Conditions इ) यांचा समावेश होतो. आरबीएसके अंतर्गत करण्यात येणा-या १०४ शस्त्रक्रियांपैकी ५२ शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनामध्ये होतो. तर उर्वरित ५२ शस्त्रक्रियांमध्ये ३१ प्रकारच्या दातांच्या विकारांचा समावेश होतो. सदरच्या शस्त्रक्रिया या सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये तसेच आरबीएसके अंतर्गत अंगीकृत झालेल्या राज्यातील १५ जिल्ह्यातील ६० हून अधिक रुग्णालयांमध्ये करण्यात येते.

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र हा अंत्यत महत्वाकांक्षी प्रकल्प असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील अंगणवाडी स्तर आणि शासकीय व निमशासकीय शाळास्तरांवरुन संदर्भित करण्यात आलेल्या बालकांच्या बौध्दिक, मानसिक आणि शारिरीक स्थितीचा विकास आणि उपचार करणेसाठी राज्यातील ३४ जिल्हयांमध्ये डिईआयसी स्थापन करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाजवळील डिईआयसी केंद्रामध्ये संदर्भित करण्यात आलेल्या बालकांना विविध तज्ञांमार्फत उपचार देवून त्या बालकांचे बौध्दिक, मानसिक आणि शारिरीक स्थितीचा विकास साधला जातो.

सदर योजनेचा लाभ घेणेकरिता आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा ताई किवा आरोग्य सेविका, आरबीएस पथक, आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button