
अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. यांच्या हस्ते उद्घाटन; गरजू मातेच्या मदतीसाठी सीआरपीएफ जवानांची तात्कालिक तत्परता
अहेरी : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात रविवारी, १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. यांच्या हस्ते करण्यात आले. नक्षलविरोधी अभियानात सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीस दलातील विविध पथकांच्या अधिकारी, जवान आणि स्थानिक नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नागपूर येथील शालिनीताई मेघे रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तब्बल २२८ जणांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान केले, ज्यामुळे पोलीस दलाची एक संवेदनशील आणि उदात्त प्रतिमा समोर आली आहे.
अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम राबविण्यासाठी प्राणहिता पोलीस उपमुख्यालय हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे दरवर्षीच मोठ्या उत्साहाने सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाही येथील जवानांनी कर्तव्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखत मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. ग्रामपातळीपासून ते शहरी भागापर्यंत कार्यरत असलेल्या जवानांच्या या दातृत्वामुळे संकटग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक समाजात एकता आणि सेवाभावाची जाणीव अधिक दृढ झाली आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. यांच्या नेतृत्वात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDO) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून जवानांसमोर आदर्श ठेवला. यामध्ये मुलचेराचे ठाणेदार महेश विधाते, आष्टीचे ठाणेदार विशाल काळे आणि अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्यासह इतरही पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेतून केवळ २२८ युनिट रक्त गोळा झाले नाही, तर मानवतेचा एक मजबूत संदेश संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला.
रुग्णासाठी तत्काळ प्रतिसाद ; जवानाने दाखवली तत्परता
रक्तदान शिबिर सुरू असतानाच वर्षा सोनटक्के नामक महिला तेथे पोहोचली आणि तिने आपली आई विमला बाबुराव बामनकर यांना रक्ताची अत्यंत तातडीने गरज असल्याचे सांगितले. ही आणीबाणीची परिस्थिती पाहता उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांनी तात्काळ ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगट असलेल्या जवानांना पाचारण केले. माहिती मिळताच सीआरपीएफ (CRPF ग्रुप क्र. १७) चे जवान निलेश सातपुते आणि राजाराम (खाँ) यांनी अहेरी रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संबंधित रुग्णाला सोमवारी रक्ताची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार या दोन्ही जवानांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन संबंधित मातेला रक्तदान करण्याचा निश्चय केला असून, जवानांच्या या तात्परतेचे व संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



