
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात दहशतीच्या नावाखाली तरुणाईने उच्छाद मांडल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत १९ वर्षीय तरुणाकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून, हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या या मुलांना आता खाकीचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही दिवसांत महाकाली मंदिर परिसर, रामाळा तलाव परिसर आणि महात्मा फुले चौक बाबुपेठ येथे काही युवक हातात शस्त्र घेऊन नागरिकांना धमकावत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार घडले आहेत.
असाच एक प्रकार २८ सप्टेंबर रोजी बाबुपेठमधील अटलबिहारी गार्डनजवळ घडला. १९ वर्षीय एक युवक धारदार हत्यार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने बाबुपेठ गाठून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपी हरी पप्पू गोस्वामी (वय १९, रा. सोनामाता मंदिर मागे, बाबुपेठ वार्ड) याच्या राहत्या घरी झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना तीन लोखंडी धारदार हत्यारे सापडली. यामध्ये १ तलवार, १ कोयता व पात्याचा चाकू यांचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हरी गोस्वामी याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, पोउपनि विलास निकोडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.



