गडचिरोलीविदर्भ

अंकिसा परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ ; थेट हायवेवर लोडिंगमुळे अपघाताचा धोका

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

गडचिरोली: जिल्ह्यातील अंकिसा परिसरात रेती माफियांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरच अवैध लोडिंग सुरू केल्याने नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. डंपिंग यार्डमधून थेट हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकांमध्ये जेसीबीद्वारे रेती भरण्याचे काम खुलेआम सुरू असून, यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

रेती माफियांनी चालवलेला हा उघड-उघड मनमानी कारभार केवळ सरकारी नियमांचे उल्लंघन नसून, सामान्य लोकांच्या जिवाशी थेट खेळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाहतुकीत अडथळा: हायवेवर लोडिंग केल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहतुकीत मोठे अडथळे येत आहेत. अपघाताचा धोका: महामार्गावर खड्डे वाढले असून, रेतीचे ओझे वारंवार पडल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. अनधिकृत साठा व उत्खनन: रेती माफियांनी शासन परवानगीपेक्षा अधिक ब्रास रेतीचा साठा करून ठेवला असून, खुलेआम त्याची विक्री सुरू आहे. तसेच, परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केले जात आहे.

स्थानिक नागरिकांचा गंभीर आरोप आहे की, प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही परिस्थिती केवळ अंकौसापुरती मर्यादित नसून, तालुक्यातील जवळपास सर्वच रेती क्वारी मालक मनमानी कारभार करत आहेत. धोकादायक पद्धतीने रेती वाहतूक करणे ही नित्याची बाब बनली आहे.

स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी प्रशासनास तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा, लोकशाही मार्गाने मोठ्या जनआंदोलनाला प्रारंभ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही गंभीर समस्या लक्षात घेता, प्रशासनाने त्वरित कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button