
उन्हाळी शिबिराचा विशेष उपक्रम, शस्त्र प्रदर्शन आणि व्हीआर मॉलचा लुटला मनमुराद आनंद
गोंदिया : आदिवासी बोलीभाषेतून ज्ञान मिळवणारे चिमुकले जेव्हा शहराच्या चकाकीत येतात आणि तिथल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुतूहल पाहण्यासारखे असते. असाच एक अविस्मरणीय अनुभव नुकताच देवरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोरगाव/बाजार शासकीय कन्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी घेतला. उन्हाळी शिबिराचा एक भाग म्हणून या विद्यार्थिनींचा नागपूर येथे एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी केवळ मेट्रोतून प्रवासच केला नाही, तर पोलीस आयुक्तांशी संवाद साधून आयपीएस (IPS) अधिकारी होण्याचे स्वप्नही उराशी बाळगले.
झिरो माईल्स ते खापरी यादरम्यान मेट्रोने प्रवास करताना २३० विद्यार्थिनींच्या आनंदाला उधाण आले होते. पहिल्यांदाच मेट्रोचा अनुभव घेणाऱ्या या चिमुकल्यांनी या प्रवासाचे सोने केले. काही विद्यार्थिनींनी मेट्रोमध्येच पारंपारिक गोंडी नृत्य सादर करून उत्साह वाढवला, तर काहींनी राणी दुर्गावती यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, धावत्या मेट्रोमध्ये काही विद्यार्थिनींनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा रांगोळीतून साकारली.
मातीच्या कलाकृती, गोंडी चित्रे आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे सादरीकरण करून त्यांनी अधिकाऱ्यांची मने जिंकली. या प्रसंगी आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थिनींना कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती व्हावी, यासाठी त्यांना नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विद्यार्थिनींना विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यातील कुतूहल जागृत झाले. डॉ. सिंघल यांनी पोलीस विभागातील विविध पदांच्या नोकरीबाबत माहिती दिली आणि विद्यार्थिनींना ‘IPS’ अधिकारी होण्यासाठी प्रेरित केले. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात विद्यार्थिनींना शहरी भागातील आधुनिक जीवनाचा अनुभव देण्यासाठी ‘व्हीआर मॉल’मध्ये नेण्यात आले. येथे विद्यार्थ्यांनी ‘गेम टाईम झोन’मधील विविध खेळांचा आनंद घेतला आणि मॉलमध्ये मांडण्यात आलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शने पाहिली. राज्यसभा खासदार माया इवनाते आणि डॉ. परिणिता फुके (आ. परिणय फुके यांच्या पत्नी) यांनी खास भेट देऊन विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या एकपात्री नाटकाची आणि कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थिनींनी स्वतः रेखाटलेली ‘गोंडी चित्रे’ आणि बांबूच्या वस्तू मान्यवरांना भेट म्हणून दिल्या. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थिनींसोबत आईसक्रिमचा आस्वाद घेत संवाद साधला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरीच्या या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना एक नवी दृष्टी मिळाली आहे. शहरी संस्कृतीची ओळख करून देण्यासोबतच, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आणि उच्च अधिकारी होण्यासाठी प्रेरित करण्याचे काम या अभ्यास दौऱ्याने केले आहे.



