
तहसील कार्यालयात विशेष आढावा बैठक
चामोर्शी: ‘विदर्भाची काशी’ म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथील महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. १५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तहसील कार्यालयात आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक पार पडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेत भक्तांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
यात्रेदरम्यान होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) आणि तहसीलदार यांची ‘नोडल ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर आणि प्रवेशद्वारावर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, पुरातत्व विभागाच्या समन्वयाने प्रवेश व निर्गमन (Entry-Exit) मार्ग सुटसुटीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यात्रेसाठी स्वतंत्र दर्शन रांग: महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था केली जाईल. आरोग्य व पाणी: यात्रा परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. नदीपात्रात सुरक्षा: वैनगंगा नदीपात्रात स्नानासाठी उतरणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात राहणार आहेत.
“प्रशासकीय यंत्रणा, पोलीस विभाग आणि मार्कंडा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त नियोजनातून ही यात्रा भाविकांसाठी सुरक्षित आणि आनंददायी व्हावी, हाच आमचा प्राधान्यक्रम आहे,” असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



