गडचिरोलीविदर्भ

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या २२ कृषी केंद्रांवर कारवाई, खत विक्रीचे परवाने निलंबित

१५ केंद्रांकडून जादा दराने विक्रीचा प्रकार उघड, ४ केंद्रांचे परवाने रद्द

गडचिरोली : जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा असताना, त्याचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना जास्त दराने खत विकणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीत अनियमितता आढळल्याने तब्बल २२ कृषी केंद्रांचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर ४ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. याच काळात काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कृषी केंद्रांच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या. यामध्ये जास्त दराने खत विक्री करणे, खत असूनही ते शेतकऱ्यांना न देणे, एकाच शेतकऱ्याला २० पेक्षा जास्त युरियाच्या बॅग विकणे आणि परवाना अटी-शर्तींचे पालन न करणे अशा तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींची दखल घेऊन भरारी पथकांनी आणि जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासणीत तथ्य आढळल्याने संबंधित केंद्रांना नोटीस बजावण्यात आली होती.

गुरुवारी (दि. १०) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या दालनात २९ कृषी केंद्रांच्या प्रतिनिधींची सुनावणी झाली. यावेळी ते त्यांच्यावरील आरोपांबाबत योग्य स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे २२ केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर ४ केंद्रांचे रासायनिक खत विक्रीचे आणि ३ केंद्रांचे कीटकनाशक विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले.

१५ कृषी केंद्रांनी जास्त दराने खत विक्री केल्याचेही समोर आले आहे. यामध्ये कुरखेडा व आरमोरी येथील प्रत्येकी ५, सिरोंचा येथील ३ आणि चामोर्शी येथील २ केंद्रांचा समावेश आहे. या कठोर कारवाईमुळे आतातरी शेतकऱ्यांची लूट थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button