
वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायालयात असताना ताबा घेण्याचा प्रयत्न; पीडित शेतकऱ्यावर चंद्रपुरात उपचार सुरू
गोंडपिपरी : जमिनीचा ताबा घेण्यावरून सुरू असलेल्या वादातून एका हताश शेतकऱ्याने नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या ताफ्यासमोरच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी गोंडपिपरी तालुक्यातील हरणपायली (रिठी) येथे घडली. अरुण मारोती पारेलवार (५६) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासकीय बळाचा वापर करून उभ्या पिकाचे नुकसान केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे.
हरणपायली येथील सर्व्हे क्रमांक १ मधील ४.२७ हेक्टर वडिलोपार्जित जमिनीचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही, कथित खरेदीदार तेजिंदर सिंग दारी हे पोलीस, महसूल कर्मचारी आणि जेसीबीसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी शेतात पोहोचले. यावेळी पारेलवार कुटुंब शेतात कापूस वेचणी आणि निंदणाचे काम करत होते. दोन्ही गटांत वाद सुरू असतानाच, शेतात उभ्या असलेल्या कापूस पिकावर जेसीबी फिरवून पीक नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन डोळ्यांदेखत हिरावले जात असल्याचे आणि कष्टाने वाढवलेले पीक उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून अरुण पारेलवार उद्विग्न झाले. याच उद्वेगातून त्यांनी शेतात फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. उपस्थित पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलविले. या घटनेनंतर तणाव वाढल्याने सध्या ताबा घेण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.
पीडित शेतकऱ्याच्या अधिवक्ता ॲड. दीपा मोरे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, “प्रशासनाचा गैरवापर करून उभ्या पिकाचे नुकसान करणे हा ‘भारतीय न्याय संहिता’ कलम ३२९, ३२४ आणि ३५१ नुसार गुन्हा आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांचा आधार घेत आम्ही नुकसानभरपाई आणि संबंधित अधिकारी व खरेदीदारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी न्यायालयामार्फत करणार आहोत.”
या संदर्भात बल्लारपूरचे नायब तहसीलदार अजय मल्लेलवार यांनी सांगितले की, “खरेदीदाराच्या अर्जावरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. पारेलवार यांच्याकडे जमिनीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता, ते कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी कीटकनाशक प्राशन केले.”
प्रशासकीय उपस्थितीत एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



