गोंदियाविदर्भ

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर – पालकमंत्री नाईक यांचे आश्वासन

जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

गोंदिया : अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे झालेले मोठे नुकसान पाहता, शासन आणि माणुसकीच्या नात्याने आपण सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. बाधित शेतकऱ्यांना पुरेपूर मदत मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.

रविवारी (दि. ०२) पालकमंत्री नाईक यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा करून सडक-अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया या तालुक्यांमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री नाईक यांनी यावेळी नुकसानीचा तपशील दिला. ते म्हणाले, जिल्ह्यातील ९०० गावे बाधित झाली आहेत. २९ हजार ५०.४० हेक्टर शेती क्षेत्र बाधित आहे. या अंतर्गत ६० हजार ७३ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या आधी आणि नंतर झालेल्या पावसामुळे बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानंतर ३३९ गावांचे पंचनामे पूर्ण झाले होते. मात्र, पुन्हा झालेल्या पावसामुळे आता फेरपंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान मिळालेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याची कार्यवाही थांबवावी, अशा स्पष्ट सूचना नाईक यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या. शेतकऱ्यांना व कास्तकारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

बाधित क्षेत्रातील ३० टक्के पीक विक्रीस परवानगी मिळावी यासाठी पालकमंत्री इंद्रनील नाईक हे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आपल्यासोबत उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यातील सर्वाधिक धान उत्पादन असलेला गोंदिया जिल्हा सर्वाधिक नुकसानीला सामोरा गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. ई-पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button