
भंडारा येथे ‘आयटक’चा १०६ वा वर्धापन दिन साजरा
भंडारा : केंद्र व राज्य सरकारचे कामगार तसेच जनविरोधी धोरण आणि मालकधार्जीने असलेले चार लेबर कोड (श्रम संहिता) हाणून पाडण्यासाठी कामगार वर्गाची भक्कम एकजूट आणि तीव्र संघर्ष काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा आयटकचे सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता आयटक कार्यालय, राणा भवन, भंडारा येथे अंगणवाडी कर्मचारी छाया मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयटक (AITUC) या कामगार कर्मचारी महासंघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कॉम्रेड हिवराज उके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ओबीसी जनगणना परिषदेचे मुख्य समन्वयक कॉम्रेड सदानंद इलमे यांनी सांगितले की, देशातील पहिली व सर्वात जुनी कामगार-कर्मचारी संघटना ‘आयटक’ (All India Trade Union Congress) असून तिची स्थापना ३१ ऑक्टोबर १९२० साली लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. कामगार वर्गाचे हित व स्वातंत्र्याबरोबर समाजवाद हे संघटनेचे मुख्य ध्येय आहे.
कॉम्रेड उके यांनी यावेळी कामगार कायद्यातील बदलांवर टीका केली आणि कामगार वर्गाला त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले, तर आभार कॉम्रेड वामनराव चांदेवार यांनी मानले. यावेळी कॉम्रेड लक्ष्मी सकतेल, ताराचंद देशमुख, कल्पना अणकर, पूनम टेकाम, दिनेश उईके यांच्यासह विविध कामगार कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



