गोंदियाविदर्भ

गोंदिया मुख्य डाकघरमध्ये आरोग्य शिबिर ; ‘एनसीडी जनजागृती अभियाना’अंतर्गत ८० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

उच्च रक्तदाब ‘सायलेंट किलर’ असल्याने नियमित तपासणी व योग्य जीवनशैलीचे आवाहन

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त (१७ मे) सुरू असलेल्या ‘एनसीडी जनजागृती अभियाना’चा एक भाग म्हणून, १५ जून रोजी मुख्य डाकघर, गोंदिया येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्या संकल्पनेतून हे शिबिर संपन्न झाले. शिबिरात मुख्य डाकघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखर (Sugar) तपासण्या करण्यात आल्या.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांनी नियमित बीपी व शुगर तपासणी केल्यास हृदयविकार, लकवा यांसारख्या गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते, असे सांगितले. भौतिकोपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार व पोषण यावर भर देण्याचा सल्ला दिला. याशिवाय, आरोग्य टिकवण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्व डॉ. सोनम जाधव यांनी स्पष्ट केले. स्टाफ नर्स आरती लिल्हारे यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. या तपासणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पोम्पलेट वाटप करून माहिती देण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी मुख्य डाकघर कार्यालयातील पोस्टमास्टर अनिल कुमार कटरे यांच्यासह आश्विन मेश्राम, अमोल जयस्वाल, रवींद्र पटले, अरविंद रंगारी, दोदानी, जितेंद्र भोंडे, वीणा फुले, सुनील पुंडे, सुनील ढोमणे आणि सुशील बोलणे यांचे सहकार्य लाभले.

डॉ. स्नेहा वंजारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यांनी उच्च रक्तदाबाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.

उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ (Silent Killer) म्हटले जाते, कारण त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. परंतु, तो हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूला नुकसान पोहोचवू शकतो. जेव्हा आपल्या शरीराच्या नसांवर रक्तदाब जास्त असतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा चिंता, श्वास घेण्यास त्रास होणे ही उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आहेत. कधीकधी रक्तदाब जास्त असला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जास्त मीठ खाणे, जास्त तळलेले किंवा जंक फूड खाणे, चिंता किंवा ताण, लठ्ठपणा, व्यायाम न करणे, मद्यपान आणि धूम्रपान करणे आणि अनुवंशिक कारणे ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत.

आपल्या आहारातील मीठ कमी करा, दररोज थोडा व्यायाम किंवा जास्त चालायला सुरुवात करा, ताजी फळे आणि भाज्या खा, ताण कमी करा, ध्यान किंवा योगासने करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि नियमितपणे रक्तदाब तपासा. हे सोपे उपाय उच्च रक्तदाब रोखण्यास मदत करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button