गडचिरोलीविदर्भ

नाल्यात आढळला ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह 

भामरागड :  तालुक्यातील तुमरकोठी येथे गुरुवारी सकाळी एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख कोमटी मासू वड्डे (रा. तुमरकोठी) अशी झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास मरकणार-तुमरकोठी मार्गावरील नाल्यात पाण्यात मृतदेह आढळून आला. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी तातडीने पथक घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

सध्या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तुमरकोठी हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असून छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागात आहे. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button