गडचिरोलीविदर्भ

शेतकरी-शेतमजुरांचा एल्गार! ; २ मार्चला ‘त्या’ जाचक ‘जीआर’ची होळी

भेंडाळा बस स्थानकावर सामुदायिक होळी दहन आंदोलन ; तालुका काँग्रेसचे प्रमोद भगत करणार नेतृत्त्व

चामोर्शी : राज्य शासनाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहण संदर्भातील नवीन शासन निर्णयामुळे (जीआर) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या जाचक निर्णयाचा निषेध करण्यासाठी २ मार्च रोजी सकाळी भेंडाळा येथील बस स्टॉप येथे शासन निर्णयाच्या प्रतिची ‘सामुदायिक होळी’ करून आंदोलन छेडले जाणार आहे.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडणार आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, १० फेब्रुवारीचा ‘जीआर’ हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. या निर्णयामुळे आगामी काळात भेंडाळा भागातील सुपीक जमिनींचे अधिग्रहण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. योग्य मोबदला, ठोस पुनर्वसन धोरण आणि पर्यायी उपजीविकेची कोणतीही कायदेशीर हमी न देता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या जीआर मुळे प्रस्तावित भूसंपादनामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाच्या नव्या धोरणात मोबदल्याबाबत पारदर्शकता नसल्याचा दावा. जमिनी गेल्या तर त्यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न उग्र होणार आहे.

“शासनाने काढलेला हा नवा आदेश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा आहे. बळीराजाच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. जर २ मार्चच्या आंदोलनानंतरही सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर संपूर्ण चामोर्शी तालुक्यात हे आंदोलन तीव्र केले जाईल,” असा इशारा प्रमोद भगत यांनी दिला आहे.

आगामी भूसंपादनाच्या भीतीमुळे भेंडाळा भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या आंदोलनाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास नजिकच्या काळात हे आंदोलन जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button