
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिली माहिती ; गोंदिया पोलिसांची कारवाई
गोंदिया : महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचालींना लगाम लावत गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम परिसरात पोलिसांनी छापा टाकून जमिनीखाली गाडलेला एके-४७, एसएलआर आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, सी-६० पथकाने जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. या मोहिमेत नक्षलवाद्यांनी लपवलेला रायफल्स: १ एके-४७, २ एसएलआर, १ कोल्ट ऑटोमॅटिक पिस्टल, १ १२ बोर रायफल. दारुगोळा: १८७ एसएलआर राउंड, ५८ एके-४७ राउंड, ३५ रायफल (.३०३) राउंड आणि इतर मॅगझिन्स. स्फोटक साहित्य: ८.५ किलो स्फोटक पदार्थ, १ क्लेमोर मायन, बीजीएल शेल्स आणि ८३ लोखंडी छर्रे. इतर साहित्य: वॉकीटॉकी, सोलर प्लेट्स, बॅटरी, कलर प्रिंटर आणि डेटोनेटरसह कॉर्डेक्स वायर. इत्यादी साठा जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने २००५ पासून राबवलेल्या ‘आत्मसमर्पण योजने’ मुळे नक्षलवादी चळवळीला गळती लागली आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी एमएमसी झोनचा प्रवक्ता अनंत ऊर्फ विकास नागपुरे याने १० साथीदारांसह, तर १३ डिसेंबर रोजी कमांडर रोशन बेडजा याने सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. आतापर्यंत दरेकसा एरिया कमिटीमधील एकूण १४ नक्षलवादी मुख्य प्रवाहात सामील झाले असून, त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच हा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी शासन देत आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल आणि पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पो.नि. प्रमोद भातनाते, स.पो.नि. संजय नाईक, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे आणि सी-६० झोडे पथकातील जवानांचा समावेश होता.



