चंद्रपूरविदर्भ

बिबट्याच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू

पद्मापूर-बीट परिसरातील घटना ; जिल्ह्यात यंदा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४५ जणांचा मृत्यू 

चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर-बीट परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव साहजू चमरू बिलठेरिया (६३, मूळ रा. प्रतला, जि. मंडला, मध्य प्रदेश) येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अडेगाव गावालगत कक्ष क्रमांक १८१ मध्ये बांबू कापण्याचे काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ४५ जणांचा मत्यू झाला आहे. यामध्ये वाघाने ४१ जणांना, बिबट्याने दोघांना, हत्ती आणि अस्वलाने प्रत्येकी एक बळी घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक) चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप एकाडे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिस व वनविभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा व मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. मृतकाच्या नातेवाइकांना तत्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून, पुढील तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button