
भंडारा : गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेला जिल्हा कक्ष खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरत आहे. गाव, वाडी, वस्ती, पाडे, तांडे येथील गरजू रुग्णांना या कक्षातून वेळेवर मदत मिळत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. याच कक्षाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील साखळी (ता. तुमसर) येथील संदीप ब्रीजलाल आचरकाटे या तरुणावर तातडीने हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
गेली अनेक दिवसांपासून उपचाराविना हाल सोसणाऱ्या संदीप यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा कक्षाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संदीप आचरकाटे यांच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून संदीप यांना आवश्यक असलेली वैद्यकीय आर्थिक मदत त्वरित मंजूर झाली. या मदतीमुळे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. या मदतीबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या यशाच्या पार्श्वभूमीवर, गरजू रुग्णांनी आपल्या उपचारासाठी तातडीने जिल्हा कक्षात संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक 1800 123 2211 वर संपर्क साधावा, असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी केले आहे.



