गडचिरोलीविदर्भ

अतिदुर्गम बिनागुंडा येथे अवघ्या २४ तासांत ‘पोलीस मदत केंद्रा’ची उभारणी!

सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीतील दहावे पोलीस मदत केंद्र ; गडचिरोली पोलीस दलाची मोठी झेप

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात विकासाची पहाट पोहचवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भामरागड उपविभागांतर्गत छत्तीसगड सीमेपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा या अतिदुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राची (Police Help Post) यशस्वी स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल १०५० जवानांच्या बळावर आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने हे केंद्र अवघ्या एका दिवसात उभारण्यात आले.

भामरागडपासून १७ किमी दूर असलेल्या या भागात आजही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पावसाळ्यात गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे बिनागुंडा, बंगाडी, कुवाकोडी आणि फोदेवाडा यांसारख्या गावांचा संपर्क चार महिने जगाशी तुटलेला असतो. आता या मदत केंद्रामुळे नाल्यावरील पुलाचे काम आणि प्रलंबित ७ मोबाईल टॉवर्सच्या कामाला सुरक्षा कवच मिळणार आहे. यामुळे भविष्यात या भागात एसटी बस सेवा आणि राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

हे मदत केंद्र उभारण्यासाठी पोलीस दलाने प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. १०५० जवान, ज्यात विशेष अभियान पथकाचे २०० कमांडोज, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्यांचा समावेश होता. ११ जेसीबी, १० ट्रेलर, ५ पोकलेन आणि ४० ट्रक्सचा वापर करण्यात आला. केंद्रात वायफाय, ८ पोर्टा कॅबिन, आर.ओ. प्लांट, जनरेटर शेड आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक ‘मॅक वॉल’ व ‘बी.पी. मोर्चा’ उभारण्यात आले आहेत.

मदत केंद्राच्या उद्घाटनासोबतच पोलिसांनी स्थानिक नागरिकांसाठी ‘जनजागरण मेळावा’ आयोजित केला होता. यामध्ये महिलांना साड्या, पुरुषांना धोतर-ब्लॅकेट, आणि कुटुंबांना स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. तरुणांना खेळाचे साहित्य (क्रिकेट किट, व्हॉलीबॉल) आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पोलिसांनी मैत्रीचा हात पुढे केला. २०२५ मध्ये नेलगुंडा, कवंडे, फुलनार आणि तुमरकोटी येथे स्थापन झालेल्या केंद्रांनंतर आता बिनागुंडा येथील हे केंद्र आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.

याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट शंभु कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि रोहन पाटील यांच्याकडे या केंद्राची धुरा सोपवण्यात आली आहे. या नवीन केंद्रामुळे केवळ नक्षली कारवायांना चाप बसणार नाही, तर दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होऊन प्रशासनाप्रती विश्वास वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button