गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

‘ती’ छोटी पाहुणी अन् ‘अप्पर आयुक्तां’ची खुर्ची! : कोरचीच्या हिमांशीचा नागपुरात डंका, आत्मविश्वासाने जिंकली सर्वांची मने

‘अप्पर आयुक्त कार्यालय ओळखा‘ उपक्रमात तिसरीतील विद्यार्थिनीचे विशेष कौतुक ; आदिवासी विकास विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

कोरची : दुर्गम भागातील आदिवासी मुलांमध्ये प्रशासनाविषयी कुतूहल निर्माण व्हावे आणि त्यांच्यातील न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने नागपूर येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ‘अप्पर आयुक्त कार्यालय ओळखा संवादमंच’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात कोरची येथील शासकीय आश्रमशाळेतील अवघ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या हिमांशी महेश नरोटे हिने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने आणि प्रभावी संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

२१ जानेवारी रोजी कोरची येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या १० विद्यार्थ्यांच्या पथकाने नागपुरात शैक्षणिक भेट दिली. यावेळी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हिमांशीने विचारलेले प्रश्न, तिची निरागसता आणि प्रशासकीय कामकाजाबद्दलची तिची समज पाहून आयुषी सिंह भारावून गेल्या. त्यांनी हिमांशीला चक्क आपल्या अधिकृत खुर्चीवर बसवून तिच्याशी मनमोकळा संवाद साधला. हा क्षण उपस्थित अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

‘अप्पर आयुक्त कार्यालय ओळखा’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाज: फाईल्सची हालचाल, निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन शिस्त. योजनांची माहिती: आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व आर्थिक योजना. प्रेरणा: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी गोडी निर्माण होत आहे. हिमांशीचा आत्मविश्वास पाहून आम्हाला खात्री पटली आहे की, आमचे विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील. त्यांच्या भविष्यातील वाटचालीस या भेटीमुळे नवी दिशा मिळाली असल्याचे मुख्याध्यापक उमाकांत ठोक यांनी म्हटले.

हिमांशीच्या या यशात तिचे वर्गशिक्षक मनोज आचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हिमांशीच्या या धाडसाचे आणि बौद्धिक कौशल्याचे गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम., सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू सादमवार आणि नागपूरच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीजा देवीदास उईके यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. सध्या संपूर्ण कोरची परिसरात आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हिमांशी एका ‘रोल मॉडेल’च्या रूपात समोर आली असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button