गडचिरोलीविदर्भ

भामरागड प्रकल्पातील 26 विद्यार्थ्यांची नीट-जेईई विशेष प्रशिक्षणासाठी निवड

आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; फिझिक्सवाला मार्फत दोन वर्षांचे मोफत निवासी प्रशिक्षण 

गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत तब्बल 26 विद्यार्थ्यांची निट व जेईई विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमरावती व नागपूर विभागातून निवड झालेल्या 100 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थी हे भामरागड प्रकल्पातील असल्याने हा प्रकल्पासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग व फिझिक्सवाला यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना NEET व JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यस्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेत भामरागड प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. NEET प्रशिक्षणासाठी 11 मुले व 14 मुली अशा एकूण 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून JEE प्रशिक्षणासाठी एका मुलीची निवड झाली आहे. अशा प्रकारे एकूण 26 विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे.

संस्थेमार्फत हे निवासी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार असून विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे नियमित, दर्जेदार व स्पर्धात्मक वातावरणात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांसाठीचे वर्ग शासकीय आश्रमशाळा, शिरड शहापूर, जि. हिंगोली येथे तर मुलींसाठीचे वर्ग शासकीय आश्रमशाळा, सिंदी विहीरी, जि. वर्धा येथे 18 मे 2026 पासून सुरू होत आहेत.

विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेबाबतची भीती दूर व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भामरागड प्रकल्प कार्यालयामार्फत पात्रता परीक्षेच्या धर्तीवर दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यास मदत झाली आणि गुणवत्तापूर्ण तयारीची दिशा मिळाली.

या यशामध्ये प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान राहिले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर आयुषी सिंग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आदिवासी विकास विभागाने शिक्षण क्षेत्रात नवी दिशा निर्माण केली असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button