गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ
गळ्यातील छोटी शिटी ठरतेय विद्यार्थ्यांची ‘सुरक्षा कवच’! ईतलचेरू जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; संकटाच्या वेळी शिटी म्हणजे मदतीचा सायरन
ईतलचेरू जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; संकटाच्या वेळी शिटी म्हणजे मदतीचा सायरन

गळ्यातील छोटी शिटी ठरतेय विद्यार्थ्यांची ‘सुरक्षा कवच’!
ईतलचेरू जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; संकटाच्या वेळी शिटी म्हणजे मदतीचा सायरन
गडचिरोली , दि ३ १ ऑगस्ट : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ईतलचेरू येथे ‘सुरक्षा शिटी’ (Whistle for Security) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक खुर्शीद शेख यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षण, प्रसंगावधान आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी घरापासून शाळेपर्यंत पायी ये-जा करतात. या प्रवासात निर्जन रस्ते, जंगल परिसर, मोकाट जनावरे, साप-विंचू किंवा अनोळखी व्यक्तींकडून धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात सहज वापरता येणारे सुरक्षासाधन असावे, या उद्देशाने शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिटी उपलब्ध करून दिली आहे.

सुरक्षा शिटीचा वापर केव्हा आणि कसा करायचा, याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाईट स्पर्श, कोणी त्रास देणे अथवा पाठलाग करणे, मोकाट कुत्रे किंवा जनावरे, साप-विंचू दिसणे तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत शिटी वाजवून आसपासच्या नागरिकांचे, शिक्षकांचे किंवा सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे, असे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना बाल हेल्पलाइन क्रमांक १०९८ लक्षात ठेवण्यासही प्रवृत्त केले जाते.
या उपक्रमाचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना अनेकदा झाला आहे. अंगावर येणारे कुत्रे शिटी वाजवताच दूर गेले. स्वच्छतागृहाजवळ साप आढळल्यानंतर शिटी वाजवल्याने तत्काळ मदत मिळाली. शाळेत आलेल्या माकडालाही शिटीच्या आवाजाने दूर पिटाळण्यात आले. एका प्रसंगी अनोळखी संशयित व्यक्ती पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांच्या समूहाने शिट्या वाजवल्याने संबंधित व्यक्ती घाबरून निघून गेली.
दररोज विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाचा भाग म्हणून शिटी गळ्यात घालून पाठविली जाते. तिची स्वच्छता व कार्यक्षमता तपासली जाते. ‘हमारी सुरक्षा १०९८’, ‘बॅड टच से’, ‘दूषित अन्न-पाण्यापासून’, ‘प्राण्यांपासून’ आणि ‘गाड्यांपासून’ अशा सुरक्षा संदेशांचीही उजळणी केली जाते. गरज नसताना शिटी वाजविल्यास दंडाची तरतूद असल्याने तिचा जबाबदारीने वापर करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जात आहे.

कमी खर्चात सहज राबविता येणारा हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याची गरज आहे. शासनाने शालेय गणवेशासोबत नाममात्र २० रुपयांची सुरक्षा शिटी उपलब्ध करून दिल्यास बालसुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊ शकते.



