
पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची संयुक्त कारवाई
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनासोबत संयुक्तपणे कारवाई करत शासनाने बंदी घातलेला सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (१३ सप्टेंबर) करण्यात आली असून, या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुनी-मोरगाव पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित तंबाखूच्या मोठ्या व्यवहाराची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शनिवारी सजित भगवत मेश्राम (वय ४५, रा. सावरटोला) आणि विलास धनराज वैद्य (वय ३७, रा. बोरटोला) यांच्या घरावर धाड टाकली. या धाडीत पथकाला विविध कंपन्यांचा १०२.०८ किलो वजनाचा तंबाखू साठा सापडला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ३६ हजार ३०५ रुपये आहे.
आरोपी सजित मेश्राम याने त्याचा मेहुणा विलास वैद्य याला या व्यवसायात सहभागी करून घेतले होते. विलासने अर्जुनी-मोरगाव येथील एका भाड्याच्या खोलीत हा तंबाखू साठा लपवून ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी महेश प्रभाकर चहांदे यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
३ सप्टेंबर रोजी माहिती मिळाल्यानंतर लगेचच कारवाईचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव तो होऊ शकला नाही. त्यानंतर १० दिवसांनी पोलिसांच्या या कारवाईमुळे तंबाखू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.



