गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच आपले ध्येय – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

आलापल्लीतील रोजगार मेळाव्यात हजारो बेरोजगारांची हजेरी

अहेरी : एकेकाळी आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व उद्योगविरहित जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हळूहळू आपल्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग उभारी घेत आहेत. विविध नामांकित कंपन्या जिल्ह्यात येऊ लागल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये येथील बेरोजगार युवक-युवतींना नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वाढती बेरोजगारीची समस्या दूर करणे हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

रविवारी (18 ऑगस्ट) आलापल्ली येथील क्रीडा संकुल परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो बेरोजगार आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे, ऋषिकांत पापडकर, युनूस शेख, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरठे, एटापल्लीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री धर्मरावबाबा म्हणाले, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हवी तशी नोकरी न मिळाल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वांनाच चरितार्थ चालवताना पैशांची गरज भासते. पण ती गरज भागविताना नोकरी, अर्थात कामाच्या संधी सध्याच्या काळात मिळत नाहीत. त्यामुळेच शिक्षण, सिंचन आणि रोजगार हे ब्रीदवाक्य घेऊन आपण निवडणुकीला सामोरे गेलो आणि लोकांनी भरभरून प्रेम दिले. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपला सतत प्रयत्न सुरू आहे. या भागातील प्रत्येक युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात जवळपास 34 कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहे. या विविध कंपन्यांमध्ये जवळपास 12 हजार 500 बेरोजगार युवक-युवतींना आपापल्या स्किलनुसार टप्प्याटप्प्याने काम दिले जाणार आहे. त्यामुळे या रोजगार मेळाव्याचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या 15 वर्षात जे काम राज्यमंत्री पदावर असताना मी करू शकलो नाही ते काम या पदावर आल्यावर केले आहे. त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. म्हणून माझ्यावर टीका करण्याचे काम ते करीत आहेत. मात्र टीका केल्याशिवाय काम देखील करता येत नाही. त्यामुळे विरोधकांनी अशीच टीका करत राहावी, मी लोकहिताची कामे करत राहणार, असे चिमटेही त्यांनी काढले.

या भव्य रोजगार मेळाव्यात जवळपास 10 ते 12 हजार बेरोजगार युवक-युवतींनी हजेरी लावली होती. मेळाव्यात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आयोजकांकडून जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केले. रोजगारासंदर्भात विस्तृत माहिती को-ऑर्डिनेटर तस्मिया शेख यांनी दिली. सूत्रसंचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले.

केवळ या नामांकित कंपन्यांमध्येच नाही, तर कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात आली. युवकांना नियुक्तीपत्र देत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलाखत दिलेल्या अर्जकर्त्या उमेदवारांना पुढील काही दिवसातच मोबाईलवर संपर्क करून पाचारण करून त्यांना विविध क्षेत्रात नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. पुणेपासून तर आलापल्लीपर्यंत विविध कंपन्यांमध्ये सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे, तस्मिया शेख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button