परभणीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा भव्य राज्य मेळावा; पदग्रहण, सन्मान व प्रशिक्षण सोहळा ९ ऑगस्टला
राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती; पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहांवर मार्गदर्शन

राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती; पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहांवर मार्गदर्शन
परभणी : व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथे राज्यस्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नव्या राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा, मान्यवरांच्या हस्ते सन्मान तसेच पत्रकारांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे.
सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात संघटनात्मक आढावा, बदलत्या पत्रकारितेवरील मार्गदर्शन, डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व आणि आगामी वाटचालीचे नियोजन यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्यात नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकुळोळ, नरेंद्र देशमुख यांच्यासह नव्या राज्य कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा आणि सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, विभागीय पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या निमित्ताने संघटनात्मक बळकटीकरण, नवीन सदस्य नोंदणी, पत्रकार संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांबाबत ठोस कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सत्रांमध्ये बदलती पत्रकारिता, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, पत्रकारांची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी, कौशल्य विकास आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी परभणी जिल्हा टीमकडून जोरदार तयारी करण्यात आली असून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सर्व नियोजन पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी राज्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध विंगच्या प्रतिनिधींना या मेळाव्यात वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “संघटनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून बदलत्या पत्रकारितेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण, संघटन आणि एकजूट अत्यावश्यक आहे. या मेळाव्यातून आगामी वाटचालीचा नवा आराखडा निश्चित केला जाईल.



