गडचिरोलीविदर्भ

ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

एका तरुणाची प्रकृती चिंताजनक ; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार, अहेरी पोलिसांत गुन्हा दाखल

अहेरी : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात अहेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तलवाडा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडला. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भामरागड तालुक्यातील महाकापडी येथील रहिवासी मिडको कुम्मा पुंगाटी (४८) आणि कुम्मा महारू पुंगाटी हे दोघे आपल्या दुचाकीने प्रवास करत होते. वाटेत तलवाडा येथून चंदू महाका (१७, रा. परायणार) हा तरुण आपल्या गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या दुचाकीवर बसला होता. तलवाडापासून साधारण ३ किमी अंतरावर असताना एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला मागून भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या कडेला लांब फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच टायगर ग्रुपचे साई तुलसीगिरी आणि रुग्णवाहिका चालक समीर सलाम शेख यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. अपघातानंतर परिसरात प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू झाल्याने जखमींना रुग्णालयात नेताना मदतकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

जखमींना तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मिडको पुंगाटी आणि कुम्मा पुंगाटी यांना मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्या आशिष महाका याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी समीर शेख यांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी फरार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button