गोंदियाविदर्भ

विद्युत तारांचे घर्षण होऊन घराला आग, घर जळून खाक

तुंबडीकसा येथील अरकरा कुटुंबावर काळाचा घाला; चार भावंडांचे कुटुंब उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

आगीच्या धसक्याने मातेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, कुटुंबावर दुहेरी संकट

देवरी : तालुक्यातील ककोडी क्षेत्रातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा गावात १० जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भीषण दुर्घटना घडली. विद्युत तारांचे घर्षण होऊन त्यातून उडालेल्या ठिणगीने अरकरा कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे चार भावंडांचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले. या आगीच्या धसक्याने अरकरा यांच्या आईचे बुधवारी (दि. ११) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने, अरकरा कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे गिरधारी अरकरा, विनोद अरकरा, रामू अरकरा आणि मेसराम अरकरा हे चार भाऊ आपल्या आईसह एकाच घरात राहत होते. १० जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अरकरा कुटुंब शेजारच्या घरी बसलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. याचवेळी घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन एक ठिणगी अरकरा यांच्या घरावर पडली. वाऱ्यामुळे क्षणात संपूर्ण घराला भीषण आग लागली.

शेजारी व गावकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अरकरा यांच्या घराकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येईपर्यंत चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाले होते. या आगीत रोख पैसे, धान्य, कपडे, तांदूळ, शेतीकरिता घेतलेले बियाणे आणि घरातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज पूर्णतः जळून खाक झाले.

 घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याने आणि घरातील सर्व साहित्य जळून राख झाल्याने आता आपले कुटुंब सावरणार कसे, या चिंतेने चारही भावंडांची आई, मानकुवर लतखोर अरकरा (वय ६०) यांना ग्रासले. घर जळाल्याचे दुःख त्या सहन करू शकल्या नाहीत. याच धक्क्याने गुरुवारी (दि. ११) त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे अरकरा कुटुंबीयांवर हे दुहेरी संकट कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी गायधने, कोतवाल कोटांगले, सरपंच रामदेव सौरी आणि पोलिस पाटील गुलाबदास हिरवाणी यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा तयार करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, अरकरा कुटुंबीयांचे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने अरकरा कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button