
भंडारा : राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भंडारा यांच्या अखत्यारीतील मांडवी ते ढिवरवाडा रस्त्याची दोन वर्षापासून दुरवस्था कायम आहे. डांबर रस्त्यांचे सालपटे निघून अगणित खोल खड्डे पडले आहेत. परंतु केवळ लिपापोती करून मलाई खाण्याचे काम विभागाकडून होत आहे. २३ मार्च रोजी रविवारला दुपारी ११:४५ वाजता भंडाराकडून ढिवरवाडाकडे येत असलेला अनोळखी तरुण दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे दुचाकी उसळून गंभीर जखमी झाला.
अनोळखी तरुण एकटाच बेशुद्धावस्थेत अर्धा तास कोका वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या मांडवी ते ढिरवाडा रस्त्यावर पडून होता. खड्ड्यांमुळे घडलेल्या अपघाताची माहिती होताच ढिवरवाडा व मांडवी येथील नागरिक मदतीला धावले. ढिवरवाडाचे माजी सरपंच धामदेव वनवे यांनी रुग्णवाहिकेचा चालक प्रमोद मोहतुरे यांना माहिती दिली.
जखमीस रुग्णवाहिकेतून भंडारा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी मांडवीचे पोलिस पाटील कोटांगले, ढिवरवाडा येथील निकेश ठवकर, भगवान बुराडे, राहुल बेदरकर, हनुवंत कनपटे, गौरीशंकर लांडगे आदी उपस्थित होते. सुरू असलेल्या बांधकामाची चौकशी करावी, नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, खड्यांमुळे जखमी झालेल्या तरुणास नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच धामदेव वनवे व नागरिकांनी केली आहे.



