गडचिरोलीविदर्भ

दारूविक्री केल्यास 25 हजारांच्या दंडासह होणार पोलिस कारवाई

बैठकीत ठराव ; महिलांच्या एकजुटीमुळे अवैध दारू विक्रेत्यांना चाप

एटापल्ली : तालुक्यातील पंदेवाही येथे गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महिलांनी एकजूट दाखवली आहे. यासाठी पोलीस अधिकारी आणि मुक्तीपथ टीमच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत शेकडो महिलांनी दारूबंदीचा निर्धार केला. यासोबतच, गावात यापुढे कोणीही दारू विकताना आढळल्यास त्याच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याबरोबरच त्याच्याविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण सभेत मुक्तीपथचे तालुका संघटक किशोर मलेवार यांनी दारूबंदीच्या कायद्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे यांनी कायद्याचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होत असल्याची आणि गावातील शांतता भंग पावत असल्याची गंभीर समस्या मांडली. गावात पुन्हा शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, यापुढे जर कोणी गावात दारू विकताना आढळल्यास त्याच्याकडून २५ हजार रुपये दंड आकारला जाईल आणि त्याच्यावर तातडीने पोलीस गुन्हा दाखल करण्यात येईल. दारूबंदीच्या मागणीसाठी गावातील ८३ महिलांच्या नावे व स्वाक्षरी असलेले निवेदन तयार करण्यात आले असून ते लवकरच पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे यांना सादर करण्यात येणार आहे.

या बैठकीला जानू आत्राम भूमय्या, पोलीस पाटील वळू आत्राम, महारी आत्राम, सुकरी आत्राम, देवेंबाई नरोटी, रमीबाई तलांडे, मालू गावडे, सत्तू गावडे, मैनी आत्राम यांच्यासह गावातील १५० हून अधिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या एकजुटीमुळे पंदेवाही गावात लवकरच अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button