गडचिरोलीविदर्भ

टेकमपल्ली ग्रामस्थांच्या एकजुटीने सात वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद

पोलीस पाटलांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांना यश ; इतर गावांसाठी प्रेरणास्रोत

अहेरी : तालुक्यातील टेकमपल्ली या गावाने एक प्रशंसनीय उदाहरण घालून दिले आहे. पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत मागील सात वर्षांपासून आपल्या गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद केली आहे. या प्रयत्नांमुळे टेकमपल्लीने आता ‘दारूमुक्त गाव’ अशी ओळख मिळवली आहे.

एक काळ असा होता, जेव्हा टेकमपल्ली गावात दारूविक्री मोठ्या प्रमाणात चालायची आणि त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या होत्या. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी गावाचे पोलीस पाटील भिमराव मडावी यांनी हिमतीने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गावात दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत गावकऱ्यांनी एकजुटीने अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी कठोर प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि गेल्या सात वर्षांपासून टेकमपल्ली गाव दारूमुक्त म्हणून ओळखले जाते. या गावात आदिवासी समाजाची संख्या अधिक आहे आणि दारूबंदीमुळे दारू पिणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. आता गावात भांडणे-तंटे होत नाहीत, आणि ग्रामस्थ शांततेने एकत्र येत गावाच्या विकासात सक्रियपणे योगदान देत आहेत.

गावातील लोकांनी लागू केलेली ही दारूबंदी कायम टिकावी आणि गावात पुन्हा दारूविक्री सुरू होऊ नये, यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुक्तिपथची टीम नियमितपणे गावाला भेट देऊन दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये एकोपा कायम राखण्याचे आवाहन करत आहे.

टेकमपल्ली गावाने केलेल्या या विशेष कार्याची प्रेरणा इतर गावांंनाही मिळावी, यासाठी गावात दारूबंदीचा विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावाच्या मुख्य ठिकाणी दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्यात आला असून, ही दारूबंदी अधिक प्रभावीपणे टिकवण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना देखील स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून गावातील दारूविक्रीवर कठोर नियंत्रण ठेवले जात आहे. टेकमपल्लीच्या या यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button