
२५० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग ; हेल्मेट वापरण्याचे अहेरीवासीयांना आवाहन
अहेरी : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे (रेझिंग डे) औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अहेरी येथे भव्य ‘रस्ता सुरक्षा बाईक रॅली’ काढण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीतून वाहतूक नियमांचे पालन आणि हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता पोलीस उपमुख्यालय प्रानहिता येथून या बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. रॅली पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथून सुरु होऊन अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौक, मस्जिद चौक आणि परिसरातील मुख्य रस्ते ते परत पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे विसर्जित झाली. या रॅलीत सहभागी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी स्वतः हेल्मेट परिधान करून “सुरक्षित प्रवास, सुखी प्रवास” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
अहेरी उपविभागातील पोलीस दलाच्या विविध तुकड्यांनी या रॅलीत आपला सहभाग नोंदवला. यामध्ये विशेष पथके: विशेष अभियान पथक (C-60), श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS). विभाग: मोटार परिवहन विभाग, पोलीस स्टेशन अहेरी आणि पोलीस उपमुख्यालय प्राणहिता. उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या उपस्थितीत हे आयोजन यशस्वी झाले.
०२ ते ०८ जानेवारी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात रेझिंग डे सप्ताह साजरा होत आहे. या काळात अहेरी उपविभागात शस्त्र प्रदर्शन: शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलिसांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती. जनजागृती: सायबर गुन्हे, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृतीपर फलक प्रदर्शन. स्वच्छता: पोलीस ठाणे व वसाहत परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन. आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
“पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही जनतेशी संवाद साधत आहोत. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, हाच या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अहेरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



