गडचिरोलीविदर्भ

येडानुर येथील अवैध दारूविक्रीविरोधात महिला एकवटल्या ; २७ दारूविक्रेत्यांना दिला इशारा

चामोर्शी : तालुक्यातील येडानुर हे गाव गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध झाले असून, यामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. या सामाजिक समस्येला आळा घालण्यासाठी ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला आहे. याकरिता गावातील महिला एकवटल्या असून, त्यांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी भेट देत अवैध व्यवसाय थांबवण्याचे आवाहन केले आहे.

गावात 10 मार्च ला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात आली. त्यात दारू विक्री बंद करण्याचा निर्णय झाला. निर्णयाची प्रत गावातील मुख्य ठिकाणी लावून दारूविक्रेत्यांना सूचना देण्यात आली. त्यानंतर 11 मार्च रोजी महिलांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुक्तीपथचे उपसंघटक आनंद सिडाम यांनी आदिवासी समाजात देव कार्याला दारू लागते हा गैरसमज आहे त्याविषयी कुपार लिंगो धर्म गुरू यांचे व इतर दाखले देत हा गैरसमज दूर केला आणि विनोद पांडे यांनी दारूविक्रीमुळे गावाचे होणारे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान महिलांच्या लक्षात आणून दिले. जर सर्व महिलांनी एकत्र येऊन लढा दिला, तर निश्चितच गाव दारूमुक्त होऊ शकते, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीनंतर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत, मुक्तीपथ टीम आणि गावातील महिला व पुरुषांच्या सहकार्याने थेट कृतीला सुरुवात केली. गावातील तब्बल २७ दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना दारूविक्री तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. “पुन्हा गावात अवैध दारूविक्री आढळल्यास पोलीस विभागाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा दमही यावेळी विक्रेत्यांना देण्यात आला. मुक्तीपथ टीमच्या मार्गदर्शनाखाली गावाला दारूमुक्त करण्यासाठी महिलांनी विविध कृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. या मोहिमेत गावातील महिला, पुरुष सहभागी झाले. यावेळी मुक्तीपथचे आनंद सिडाम, विनोद पांडे आणि ‘स्पार्क’च्या समीक्षा ढोंगे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button