
खुलताबाद : मोबाइलवर रील बनविताना रिव्हर्स गिअर पडून कार सरळ खोल दरीत कोसळून एका तरुणीचा जीव गेला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास खुलताबाद येथून जवळ असलेल्या धार्मिक व पर्यटनस्थळ सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता सुरवसे ही तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय २५, रा. हनुमानगर) याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून कारने (एमएच. २१, बीएच.०९५८) सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात दुपारी फिरायला आली होती.
या ठिकाणी गाडी चालविताना मोबाइलवर रील बनविण्याचे तिने शिवराजला सांगितले. त्यानुसार शिवराज रील बनवू लागला. याचवेळी श्वेताकडून कारचा रिव्हर्स गिअर पडला, तसेच ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर पाय पडल्याने कार पाठीमागे वेगाने जात थेट डोंगरावरून खोल दरीत कोसळली. यात श्वेताचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वेता व शिवराजच्या नातेवाइकांना घटनास्थळी बोलावून घेतले.
या घटनेची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सुलीभंजन येथील डोंगराला कठडा असता तर श्वेताचा जीव वाचला असता, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.



