होर्डिंग काढताना करंट लागून युवकाचा मृत्यू
गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात लागले आहेत अवैध होर्डिंग

गोंदिया : जिल्ह्यात नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग हे शहरांमध्ये दिसून येतात अशाच एका होर्डिंगला काढत असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया शहरातील सिविल लाईन परिसरात घडली आहे. आकाश नागरिकर (वय 21) रा. छोटा गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे. परिसरात लावलेली होर्डिंग काढत असताना जवळच असलेल्या विद्युत तारेला संपर्क येऊन करंट लागून त्याचा मृत्यू झाला.
गोंदिया शहरात जिकडे पाहावे तिथे नियम-कायदा धुडकावून कोचिंग क्लासेस, नेते व कार्यकर्त्यांचे होर्डींग लागलेले असतात. मुसळधार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे होर्डिंग पडण्याचा धोका वाढला असून, अनेकवेळा हे होर्डिंग रस्त्यावर कोसळून पादचाऱ्यांना दुखापत होण्याचे कारण बनले आहे.
छोटा गोंदिया परिसरात राहणारा आकाश नागरीकर हा युवक 18 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हनुमान चौक चौपाटीजवळील विद्युत खांबाला लटकलेले होर्डिंग काढण्यासाठी पोहोचला. हे होर्डिंग काढत असताना अचानक मोठ्या होर्डिंगच्या लोखंडी फ्रेमचा काही भाग विजेच्या तारांना आदळला आणि करंट लागून त्याचा मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने युवकाला जीव गमवावा लागल्याने परिसरातील नागरिक व मृताच्या नातेवाइकांनी होर्डिंग लावणारी एजन्सी, होर्डिंग प्रिंटर व याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अन्वये दोषी धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात करून पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.



