भंडारामहाराष्ट्रविदर्भ

शेतकरी घरीच करतील जैविक निविष्ठा तयार

जिल्ह्यात धोप व सिंदपुरी येथे ट्रायकोडर्माचे उत्पादन

भंडारा : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये भंडारा जिल्हयातील ९० गटाची निवड करण्यात आली असून त्याचे कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे गावपातळीवर व संस्थापातळीवर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असतात.

या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना घरच्या घरी जैविक निविष्ठा तयार करता याव्यात याकरीता आत्मा भंडाराच्या वतीने या गटातील इच्छुक शेतकऱ्यांची NIPHM हैद्राबाद, गुरुकुल कुरुक्षेत्र हरीयाणा येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील अनुक्रमे ४७ व २७ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. सदरचे प्रशिक्षण एप्रिल व मे २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले असुन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शेतकरी इच्छुक असल्याचे सदर प्रशिक्षणास उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्याने मनोगत व्यक्त केले.

भंडारा जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांना अधिक व्यापकतेने माहिती व प्रत्यक्ष कृतीद्वारे जैविक निविष्ठा तयार करता यावी याकरीता फार्मलॅब, येरंडा ता. मालेगाव जि. वाशिम येथे ९० शेतकऱ्यांचे प्रशिक्षण मे महिण्यात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष ट्रायकोडर्मा व इतर जैविक निविष्ठा यांचे उत्पादन आपण स्वतः तयार करु शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

वाशिम जिल्हयातील “शेतबांधावरील प्रयोगशाळा” ही संकल्पना भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या प्रशिक्षणाचा माध्यमातून रुजत असुन त्याची सुरुवात शांतीगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी धोप ता. मोहाडी व तुमसर ऑईल प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी सिंदपुरी ता. तुमसर यांनी शेतकरी कंपनी स्तरावरुन ट्रायकोडर्माचे उत्पादन सुरु केले असून या जैविक निविष्ठाचा त्यांचे गावातील व कंपनीतील भागधारक यांना माफक दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

आत्मा नियामक मंडळ, भंडारा यांचे आढावा बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली असुन जिल्हयातील शेतकरी यांना याचा अधिकाअधिक लाभ मिळावा याकरीता नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गटांना, कृषि सखी यांना जैविक निविष्ठा उत्पादनाचे प्रशिक्षण अधिक व्यपाकपणे देण्याकरीताचे निर्देश आत्मा, उमेद, माविम व कृषि विभागातील अधिकारी यांना दिले आहेत.

सेंद्रिय/नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा यापुढे जिल्ह्यातच उत्पादित होणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे आवाहन प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button