
जारावंडी येथील हृदयद्रावक घटना ; महिला गंभीर जखमी
एटापल्ली : खेळण्या-बागडण्याच्या वयात एका चिमुकलीवर काळाने घाला घातला आहे. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे घरामागे खेळत असताना शौचालयाची जुनी आणि कुजलेली भिंत अंगावर कोसळून लावण्या सुरज पत्रे या अवघ्या एक वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जानेवारी रोजी घडली. चिमुकली लावण्या आपल्या घरामागील परिसरात खेळत होती. त्याच परिसरात असलेली शौचालयाची एक भिंत अत्यंत जुनी आणि जर्जर झाली होती. खेळत असताना अचानक ही भिंत लावण्याच्या अंगावर कोसळली. ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने लावण्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतक्या वेगाने घडली की कुटुंबीयांना तिला वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
या भीषण अपघातात केवळ चिमुकलीचा जीव गेला नाही, तर कल्पना विनोद टेकाम (वय ३०) या महिला देखील गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आल्याने त्यांना मोठी इजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लावण्याच्या अकाली निधनाने जारावंडी गावातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे कुटुंबाचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा आहे, तर दुसरीकडे ग्रामस्थांमध्ये जुन्या व धोकादायक बांधकामांबाबत संताप पाहायला मिळत आहे. “अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने गावातील जुनी, पडकी आणि धोकादायक बांधकामे शोधून ती तातडीने पाडण्याची कार्यवाही करावी,” अशी मागणी आता जोर धरत आहे.
एका चिमुरड्या जिवाच्या जाण्याने पोरक्या झालेल्या पत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



