नागपूरमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबई

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; सात जणांचा जागीच मृत्यू

चार जण गंभीर जखमी

जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत. ही दुर्घटना जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली. मृतांची पूर्ण नावे पटवण्याचे काम सुरू आहे.

स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच.१२. एमएफ. १८५६) डिझेल भरल्यानंतर निघाली होती. तर अर्टिगा कार (क्र. एमएच. ४७. बीपी .५४७८) नागपूरहून मुंबईकडे निघाली होती. संध्याकाळी अकराच्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी अर्टिगा आणि राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दोन्ही कारमधील १०/१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button