चक्क जिप्सीचालकाच्या खिशात निघाला साप!
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घटना

चंद्रपूर : दुरूनच साप दिसला तरी घाबरगुंडी उडते. अशात चक्क खिशातच साप निघाला तर कल्पनाच करवत नाही; परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिप्सीचालक प्रमोद गायधने यांच्या खिशात शनिवारी मांजऱ्या जातीचा साप निघाला. सुदैवाने बिनविषारी साप असल्याने कोणतीही धोका झाला नाही. मात्र, खिशात साप दिसताच जिप्सीचालक गायधने यांची बोबडीच वळली होती.
खिशातून साप काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सोमवार, दि. १ जुलैपासून पावसाळी सुटी लागत आहे. पावसाळ्यात ताडोबा कोर झोनमधील पर्यटन पूर्णपणे बंद असते.
प्रकल्प तीन महिन्यांसाठी बंद होणार असल्याने शनिवार व रविवार, असे दोन दिवस पर्यटकांची चांगलीच गर्दी ताडोबात होती. अशातच शनिवार, दि. २९ जून रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जिप्सीचालक प्रमोद गायधने हे सकाळी सफारीसाठी तयारी करत होते. दरम्यान, त्यांनी शर्ट घातला. शर्ट घातल्यानंतर काहीतरी वळवळ जाणवली. त्यांना वाटले, शर्टाच्या आत काहीतरी दोरी किंवा अन्य काही पडले असावे. मात्र, त्यांनी बघितले असता तिथे त्यांना मोठा साप दिसला. साप दिसताच गायधने यांची बोबडी वळली. त्यांनी कशीतरी हिंमत केली व सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप काही केल्या बाहेर निघत नव्हता. यावेळी सर्पमित्र स्वर्णा चक्रवर्ती तिथेच हजर होते. त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी साप काढण्याच्या काठीने अगदी अलगद सापाला शर्टाबाहेर काढले. शर्टात निघालेला साप मांजऱ्या जातीचा बिनविषारी होता. तरीही सापाला बघून गायधने यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्यांची बोबडी वळली होती. दरम्यान, या सापाला नंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सोडून देण्यात आले.



