गडचिरोलीविदर्भ

तेली समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे – प्रमोद पिपरे यांचे आवाहन

संताजी सोशल मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गडचिरोली : तेली समाजातील विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवून उच्च शिक्षण घ्यावे. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादन करावे आणि तेली समाजाचे नाव उज्वल करावे. स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच चांगले मार्गदर्शन घेऊन तयारीला लागावे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या श्री संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेऊन समाजातील गरजू, गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि बेरोजगार विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभा करून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी केले. संताजी सोशल मंडळ गडचिरोलीतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने संताजी भवन, सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली येथे दहावी आणि बारावीतील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, एमपीएससी, यूपीएससी, पीएचडी, एमबीबीएस, आणि नवोदय स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक म्हणून सेवानिवृत्त पोलिस पाटील सुखदेव बारसागडे आणि समाजसेवक बाळासाहेब बाळेकरमकर यांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकार खंडपीठ मुंबईचे अध्यक्ष तथा माजी धर्मदाय आयुक्त समाजभूषण प्रमोद तरारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावलीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रामचंद्र वासेकर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, संताजी सोशल मंडळाचे सचिव विठ्ठलराव कोठारे, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, संताजी सोशल मंडळाचे कोषाध्यक्ष राजेश इटनकर, कार्याध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, तेली सेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा ई-गव्हर्नरचे संचालक नरेंद्र तरारे, सुधाकर लाकडे, सुरेश भांडेकर, भगवान ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे, सहा. प्राध्यापक डॉ. रामचंद्र वासेकर, संस्थाध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे आणि प्रा. देवानंद कामडी यांनी उपस्थित तेली समाज बांधव आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button