गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

बोडधा येथील हातपंप तीन महिन्यांपासून बंद

दुरुस्तीची मागणी ; अन्यथा आंदोलन - वार्डातील महिलांचा इशारा

आरमोरी : एकही गाव पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून हर घर नळ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणीटाकीचे बांधकाम केले जात आहे. मात्र, आरमोरी तालुक्यातील बोडधा येथील हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. तरीही ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नाही. त्यामुळे वॉर्डातील महिला आक्रमक झाल्या आहेत.

आरमोरी तालुक्यातील देलोडा गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोडधा येथील विनोद मेश्राम यांच्या घराजवळील हातपंप गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावांमध्ये नळ योजना असली तरी विजेचा वारंवार लपंडाव राहत असल्याने नळांना पाणी येत नाही. हातपंप दुरुस्तीसंदर्भात सूचना देऊनसुद्धा ग्रामपंचायत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

देलोडा ही मोठी गटग्रामपंचायत असून, प्रत्येक गावाचा ग्रामनिधी व शासनाकडून मिळणारा निधी जातो कुठे, असा सवालही नागरिक विचारत आहेत. ग्रामपंचायतीने ताबडतोब हातपंप दुरुस्ती करावा; अन्यथा महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही बोडधातील महिलांनी दिला आहे.

गावात पाण्याची टाकी आहे मात्र बऱ्याचवेळा नळाला पाणी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांची मदार हातपंपावर आहे. मात्र हातपंपसुद्धा बंद पडल्याने महिलांना दुसऱ्या वॉर्डात जाऊन पाणी आणावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button