
भंडारा : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचा जिल्हास्तरीय आढावा १० जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसुंगे, यांच्यासह सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
यावेळी शासनाने दिलेल्या सुधारित सूचनानुसार लाभार्थ्यांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही.
शहरी भागांमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी प्रभागात जाऊन या योजनेबाबत माहिती द्यावी, तसेच कर संकलकांना हे काम द्यावे. उमेद व जीवनोन्नती कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी महिला संबंधित काम असल्याने त्या यंत्रणांना कार्यरत करावे. रोज दाखल झालेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण 18 हजार 472 अर्ज प्राप्त झाले. गाव पातळीवर चावडीवाचन कार्यक्रम घ्यावा, चावडी वाचनातील आलेल्या आक्षेपाचे निराकरण करण्यात यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्तकोटी यांनी सांगितले.
आधार कार्डवरचे नाव जसेचे तसेच अर्जावर लिहिण्यात यावे. त्यामध्ये टंकलेखनाची चूक करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तहसीलदार महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सेतू केंद्र तसेच त्यांच्या अधिनस्त ठिकाणी सुरू असलेल्या अर्ज वितरणाच्या व अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थिती जाणून घ्यावी. शासकीय योजनेतून आधीच लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही. योजनेची अर्ज विक्री केंद्र वेळेत सुरू करावी. महिलांना अर्ज भरण्यात येणारे अडचणींविषयी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात यावे, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
मुदत 31 ऑगस्ट पर्यंत
या योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मी मागे राहिली, मला लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची भिती कोणत्याही महिलेने मनात आणू नये. गोंधळ करू नये. ऑनलाईन असल्यामुळे कोणताही अर्ज परिपूर्ण व अटी व शर्ती पूर्ण असल्याशिवाय अपलोड होणार नाही. कोणत्याही एजंटची मदत घ्यायची गरज नाही. गोंधळ, गडबड करण्याची गरज नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



