
१.०५ किलो वजनाच्या मुदतपूर्व बालकाची मृत्यू आणि अंधत्वाशी झुंज; आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे लाभले नवे आयुष्य
गडचिरोली : अवघ्या दीड महिन्याचे वय, अवघे १.०५ किलो वजन आणि जन्मापासूनच मृत्यूशी सुरू असलेली झुंज… अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत असलेल्या एका मुदतपूर्व (Premature) जन्मलेल्या बालकाची दृष्टी वाचवण्यात गडचिरोलीच्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला (DEIC) अभूतपूर्व यश आले आहे. आरोग्य विभागाच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे आणि योग्य नियोजनामुळे एका चिमुकल्याचे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचले आहे.
संबंधित बालकाचा जन्म नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच, सहाव्या महिन्यात झाला होता. कमी वजन आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये ROP (Retinopathy of Prematurity) म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याचा गंभीर आजार होण्याचा मोठा धोका असतो. जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात (SNCU) या बालकावर उपचार सुरू असताना, रेटीना तज्ज्ञ डॉ. अंकिता अप्पलवार यांनी तब्बल ७ वेळा बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली. दुर्दैवाने, प्रत्येक तपासणीत बाळाची दृष्टी खालावत असल्याचे आणि तो ‘ROP Positive’ असल्याचे निष्पन्न झाले.
बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला मोठ्या केंद्रात हलवणे धोक्याचे होते. मात्र, २० फेब्रुवारी २०२६ रोजी बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत पेंदाम यांनी बाळाची प्रकृती स्थिर झाल्याचे हिरवा कंदिल दाखवला. विलंब न लावता, ‘डीईआयसी’च्या ऑप्टोमेट्रिस्ट नम्रता मुंजमकर यांनी बाळाला सुरक्षितपणे नागपूर येथील ‘सारक्षी नेत्रालय’ येथे नेण्याची जबाबदारी स्वीकारली.
नागपूर येथे रेटीना शल्यचिकित्सक डॉ. शिल्पी नारनवरे यांनी बाळाच्या डोळ्यांवर तातडीने आणि कौशल्याने उपचार केले. या उपचारांना यश लाभले असून, २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या तपासणीत बाळाचे डोळे आता पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. बाळ आता सुखरूपपणे गडचिरोलीच्या SNCU विभागात परतले असून, त्याच्या पुढील प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
या यशस्वी कामगिरीमागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी कीलनाके यांचे मार्गदर्शन लाभले. डीईआयसी सोबतच एसएनसीयु तीलशैला सिस्टर, अधिपरिचारिका प्रमुख पूजा सागोरे इत्यादीसह मोलाचे सहकार्य लाभले. “मुदतपूर्व जन्मलेल्या मुलांमध्ये डोळ्यांच्या पडद्याचा आजार (ROP) होण्याचा धोका असतो. जर योग्य वेळी ‘स्क्रीनिंग’ (तपासणी) आणि वेळेत उपचार मिळाले, तर बालपणातील अंधत्व १०० टक्के टाळता येते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,”
“एका चिमुकल्याची दृष्टी वाचवणे, हे केवळ आमचे कर्तव्य नसून ते एका कुटुंबाचे भविष्य उजळवण्याचे कार्य आहे. संपूर्ण टीमच्या समन्वयामुळेच हे शक्य झाले.”
– डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक



