
गोंदिया : शहर पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील राधिका लॉजमध्ये युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १३) उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ उडाली. दिनेश लेखचंद पटले (३०) रा. परसवानी ता. किरणापुर जि. बालाघाट असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्या युवकाने आपल्या मित्रांना संदेश पाठवून मृतदेह घेवून जाण्याचे सुचना केल्या होत्या.
सविस्तर असे की, लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील परसवानी गावातील दिनेश पटले याने ११ जुलै रोजी गोंदिया येथील रेल्वेस्थानक परिसरातील राधिका लॉजमधील एक खोली भाड्याने घेतली. दरम्यान ११ जुलैच्या रात्रीला नातेवाईक व मित्रांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून मी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. तसेच माझे मृतदेह घेवून जावा, असाही संदेश त्याने पाठविला. यावरून त्याच्या मित्रांनी राधिका लॉज गाठली असता त्यांना त्याचा मृतदेहच दिसून आला. फिर्यादी लॉज संचालक जगदीश तुलसीराम भामनानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मृतक दिनेश पटले याच्यावर सुमारे अडीच कोटी रूपयाचे कर्ज होते. दिलेली कर्जाची रक्कम मागण्यासाठी त्याच्यावर दबाव वाढत होता. या दबावाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. व तसा उल्लेख त्याने गळफास लावण्यापूर्वी एका चिट्टीत लिहून सोडले. त्या चिट्टीच्या आधारावर पोलिसांनी तपासकार्याला सुरूवात केली आहे.



