
चंद्रपूर : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून, सिंदेवाही, सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील ३ हजार ४९३ लाभार्थ्यांसाठी घरकुल मंजूर झाले. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील वंचित कुटुंबांना आता हक्काचे घर मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, या हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली होती. याबाबत आमदार वडेट्टीवार म्हणाले, या योजनेत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी काही तांत्रिक अडचणी व त्रुट्यांमुळे लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना घरकुल मिळावे, याकरिता शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर सिंदेवाही, सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात एकूण ३ हजार ४९३ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.



