
आरमोरी : वादळ वाऱ्यातून आर्थिक, सामाजिक अडचणींचा सामना करीत संस्थापक वामनरावजी वनमाळी यांनी राष्ट्रसंत तुकडोज महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून समाज कल्याणची प्रेरणा घेऊन ही संस्था 1954 ला उभारली. मोठ्या कष्टाने आणि श्रमाने उभारलेली ही संस्था आज वटवृक्ष झाली. अनेक विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी, समाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू या संस्थेतून निर्माण झाले. शिक्षणाशिवाय आदरणीय वामनरावजींनी समाजसेवा व राजकारण सुद्धा केले. अतिशय प्रामाणिकपणे व निस्पृहपणे त्यांनी सत्य, न्याय इ. मूल्य जोपासून कार्य केले म्हणूनच त्यांना दलित मित्र, आदिवासी मित्र पुरस्कार देऊन शासनाने गौरविले. समाजसेवेचा हा वसा माजी अध्यक्ष किशोरभाऊ यांनी प्रामाणिकपणे जोपासला. त्यांच्या आदर्शावर संस्थेचे कार्य त्यांच्याच प्रेरणेवर असेच पुढे चालत राहील याची मी ग्वाही देतो असे प्रतिपादन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी यांनी केले.
मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीद्वारे संचालित सर्व विद्याशाखांद्वारा 14 जुलै हा स्वर्गीय वामनरावजी वनमाळी यांचा जन्मदिन ‘प्रेरणा दिन’ म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीच्या अध्यक्षा सुनीता वनमाळी, केशवराव कुंभारे, लखमा चौधरी,संस्थेचे पदाधिकारी दिपक वनमाळी, दिपक बेहरे, अशोक वनमाळी, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र बोंदरे, मयूर वनमाळी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, गीता गारोदे, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार व नितीन कासार उपस्थित होते.
तत्पूर्वी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या संस्थेच्या आदर्श पूर्णाकृती पुतळ्यांचे मनोज वनमाळी, केशवराव कुंभारे, दीपक बेहरे, यांच्याकडून पूजन व माल्यार्पण करण्यात आले. आणि संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. किशोर वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन लखमा चौधरी यांनी केले.
प्रमुख अतिथी केशवराव कुंभारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ‘मा. वामनराव वनमाळी आणि आमचे राजकीय, कौटुंबिक आणि सामाजिक संबंध जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे मला वनमाळी साहेबांना जवळून अनुभवता आले. त्यांनी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करण्याला प्राधान्य दिले. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्य निस्पृहपणे व निस्वार्थपणे केले. म्हणून ते माझेही आदर्श ठरतात. प्रसंगी घराकडे दुर्लक्ष झाले तरी त्यांनी आपले सामाजिक कार्य सोडले नाही. इतरांचे भले करण्यात त्यांचे आयुष्य गेले. हाच त्यांचा सेवेचा वसा त्यांच्या वारसदारांनी जोपासावा व आमच्याही कृतीत उतरावा असे प्रतिपादन केले.’
लखमा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचा गौरव केला आणि या संस्थेतून निघणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जावून लौकिक मिळविल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार हे माझेच विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी सांगितले की, संस्थेला जो जुडतो कायम जुडूनच जातो. आमच्या पूर्व संस्था चालकांनी सेवेची प्रेरणा आणि मूल्ये बीज रूपाने ठेवली तीच अजूनही आम्ही जपतो. आज अनेक आजी, माजी विद्यार्थी इथून ज्ञान शिदोरी घेऊन जीवन कृतार्थ करणारे यशस्वी विद्यार्थी आम्हाला भेटतात व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. आम्ही ही संस्था केवळ उपजीविकेचे साधन नाही तर संस्थेचे तर संस्काराचे केंद्र मानून मार्गदर्शन करतो. त्यांनी एखादी कंपनी काढली असती तर पाच पन्नास लोकांना रोजगार मिळाला असता. परंतु त्यांनी शिक्षण संस्था काढल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या पिढ्या ज्ञानाने समृद्ध करण्याचे कार्य केले. मी स्वतः या महाविद्यालाचा विद्यार्थी असल्याच्या मला गौरव वाटतो. प्रारंभी संस्थेच्या पडत्या काळात कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा मिळत असे तेव्हा स्वतः अडचण भोगून वनमाळी साहेबांनी कर्मचाऱ्यांना पगार देवून सांभाळले. या सगळ्या सेवेचे फलित आज महाविद्यालयाला विद्यापीठात ‘अ’ दर्जा मिळालेला आहे. हा दर्जा आम्ही जपला पाहिजे असे आवाहन करून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख अतिथी केशवराव कुंभारे, लोकनाथ चौधरी तसेच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू हेमके व बाबुराव शेंडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सर्व विद्याशाखात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देवून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन गोंडाने तर आभार साईनाथ अद्दलवार यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेअंतर्गत विविध विद्याशाखेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



