
लाखनी : दारूच्या नशेत लहान भावाने मोठ्या भावावर काठीने हल्ला करीत पावशीने डोक्यावर व गालावर वार करून निघृण खून केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान लाखनी तालुक्यातील न्याहारवाणी-डोंगरगाव येथे घडली. तेजानंद क्रिष्णा नागलवाडे (32), असे मृताचे नाव आहे. प्रवीण क्रिष्णा नागलवाडे (28) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
घटनेतील मृत व आरोपी हे दोघेही सख्खे भाऊ असून दोघांनाही दारूचे व्यसन होते. घटनेच्या वेळीसुद्धा ते दोघेही दारूच्या नशेत होते. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. लहान भाऊ प्रवीणने मोठा भाऊ तेजानंद याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याला तशाच अवस्थेत घरात सोडून तो गावात निघून गेला. गावातील चौकात पोलिस पाटील लेकराम नागलवाडे यांना प्रवीण हा कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसला. संशय आल्याने त्यांनी त्याला हटकले पण तो काहीच न बोलता घराकडे निघून गेला. त्याच्यावर संशय आल्याने पाठोपाठ पोलिस पाटील नागलवाडे हेसुद्धा त्याच्या घरी पोहोचले.
तेव्हा तेजानंद हा सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिस पाटील यांनी तत्काळ पालांदूर पोलिस स्टेशन व आरोग्य विभागाच्या 108 रुग्णवाहिकेला माहिती दिली. काही वेळातच पालांदूर पोलिस व रुग्णवाहिकासुद्धा पोहोचली. तेजानंद व आरोपी प्रवीण या दोघांनाही रुग्णवाहिकेने उपचाराकरिता भंडारा येथे नेत असताना वाटेतच आरोपीने तेजानंदचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपीला बाजूला केले. मात्र थोड्या दूर अंतरावर गेल्यावर तेजानंदचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीवर 103 (1) भारतीय न्याय दंड संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीला पालांदूर पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह, ठाणेदार सुनील राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.



