
गोंदिया : सार्वजनिक आरोग्य सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी “कायाकल्प” ही एक सुधारित आणि निरंतर प्रक्रिया आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत ही योजना राबवली जात असून, या अंतर्गत आरोग्य संस्थांचे मूल्यांकन एका चेकलिस्टच्या आधारे केले जाते. जिल्ह्यात एकूण १ उपजिल्हा रुग्णालय, १० ग्रामीण रुग्णालय, ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २६३ उपकेंद्र आहेत. यापैकी अनेक संस्थांनी कायाकल्प पुरस्कार प्राप्त केला असून, इतर संस्था या प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती डॉ. गोल्हार यांनी दिली.
जिल्हा गुणवत्ता आश्वासन सनियंत्रण अधिकारी डॉ. पंकज पटले यांनी सांगितले की, दरवर्षी जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेरील अधिकारी विविध टप्प्यांत चेकलिस्टद्वारे आरोग्य संस्थांचे मूल्यांकन करून अहवाल सादर करतात. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांच्या मते, आरोग्य संस्थेतील गुणवत्ता वाढवणे हे एक सांघिक कार्य आहे. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, स्वच्छक, परिचर आणि आशा सेविका अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे सर्व कर्मचारी विविध रेकॉर्ड्स आणि रजिस्टर्स अद्ययावत ठेवून, रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखून लोकांना आरोग्य सेवा देतात.
२० जून रोजी गुणवत्ता आश्वासन संनियंत्रण राज्यस्तरीय चमूने गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या चमूमध्ये नांदेड जिल्ह्यातील दक्षता मेंटॉर डॉ. गुडे वेंकटेश आणि ठाणे जिल्ह्यातील आश्वासन संनियंत्रण अधिकारी डॉ. नेहा पेटकर यांचा समावेश होता. या टीमने सडक अर्जुनी तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर बोपाबोडी आणि सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील आरोग्य केंद्रांची NQAS (National Quality Assurance Standards) मूल्यांकनासाठी पाहणी केली.
बोपाबोडी येथील भेटीदरम्यान सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील, प्रा. आ. केंद्र खोडशिवणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम लंजे, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा किरसान उपस्थित होते. भजेपार येथे प्रा. आ. केंद्र सातगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलप्रसाद महेसकर, डॉ. अंजली पांडे, भजेपार ग्रामचे सरपंच चंद्रकुमारजी बहेकार यांच्यासह दोन्ही आरोग्य संस्थांमधील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविका उपस्थित होत्या.
मूल्यांकनादरम्यान राज्यस्तरीय टीमने उपकेंद्र पाहणी, दस्तऐवज तपासणी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. पाहणीनंतर त्यांनी त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. रुग्णालय/सुविधा देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, समर्थन सेवा, स्वच्छता प्रोत्साहन
मूल्यांकनात ७०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार किंवा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश रुग्णालयांची देखभाल, पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रणासारख्या सेवांमध्ये सुधारणा करणे आहे.



