गडचिरोलीविदर्भ

कोरची-बोगाटोला मार्गावर आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह

घातपाताची शक्यता? ; परिसरात भीतीचे वातावरण

कोरची : तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला मार्गावर असलेल्या तलावाजवळ एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह अंशतः मातीने झाकलेल्या स्थितीत असल्याने आणि त्याची अवस्था पाहता हा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलेटीपदाकसा येथील पोलीस पाटील ईश्वरदास सत्तर कल्लो यांनी या घटनेबाबत कोरची पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर घटना २१ ते २३ जानेवारी २०२६ च्या दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तलावाच्या काठावर आढळलेला हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. मृतदेहाच्या अंगावर पॅन्ट आणि शर्ट आहे. दोन्ही हातांमध्ये कडे आहेत. मृतदेह बराच जुना असल्याने चेहरा पूर्णपणे काळा पडला असून शरीराला अळ्या लागल्या आहेत. मृतदेह मातीने अंशतः झाकलेला असल्याने हा प्रकार घातपाताचा असावा का? असा संशय बळावला आहे.

या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात ‘मर्ग’ दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; शवविच्छेदन अहवालानंतरच सविस्तर माहिती समोर येईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलीस प्रशासनाकडून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर कोणाकडे या वर्णनाचा व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती असल्यास किंवा अधिक माहिती मिळाल्यास तात्काळ कोरची पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button