
जनजागरण मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; पोलीस मुख्यालयात शौर्यपदक विजेत्यांचा गौरव!
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी ३१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच, त्यांनी जवानांचे मनोबल वाढवले आणि नागरिकांशी थेट संवाद साधून पोलीस दल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
भामरागड उपविभागांतर्गत अत्यंत दुर्गम अशा बिनागुंडा येथे २४ जानेवारी रोजी नवीन पोलीस मदत केंद्र (पोमकें) स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राला भेट देऊन महासंचालकांनी अभियान तयारीची पाहणी केली. अपर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत येथे ‘भव्य महाजनजागरण मेळावा’ पार पडला. मेळाव्यात दुर्गम भागातील शेकडो नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

“या नवीन केंद्रामुळे केवळ सुरक्षाच नाही, तर शासकीय योजनांची माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचेल. रस्ते, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे,” असे आश्वासन दाते यांनी यावेळी दिले. दौऱ्यादरम्यान महासंचालकांच्या हस्ते पोस्टे वांगेतुरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या जवानांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात ऐतिहासिक कसनासूर-बोरीया चकमकीत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गडचिरोलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदी वेगवर्धित पदोन्नती (Step Promotion) देऊन त्यांच्या खांद्यावर मानाचे स्टार लावण्यात आले.
“ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण कायम राहील. कठीण परिस्थितीतही प्रामाणिक राहून मोठे ध्येय साध्य करा,” असे प्रेरक आवाहन सदानंद दाते यांनी यावेळी जवानांना केले. या संपूर्ण दौऱ्यात महासंचालकांसोबत अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, निसार तांबोळी, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.



