
कुरखेडा : तालुक्यातील पुराडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हेटीनगर येथील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करुनही दुरुस्तीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने ८ ऑगस्ट रोजी गावातील लोकांनी चौकातील चिखलात धान रोवणी करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
एकीकडे संततधार पावसामुळे नागरिक हैराण परेशान आहेत, तर दुसरीकडे लोकांना पावसामुळे खूप त्रास सहन करावा लगात आहे. हेटीनगर येथील प्रशासनिक अव्यवस्थेमुळे गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून लोकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. वारंवार सूचना करून सुद्धा काहीच उपयोजना ग्रामपंचायत प्रशासनाकडून केल्या जात नसल्याचे बघून नागरिकांनी गावातील मुख्य चौकात चक्क रेड्याने नागर-फण घेवून चिखल सपाट करत धानाची रोवणी केली. गावकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणत चर्चा सुरू आहे. नागरिकांनी जरी निषेध नोंदविला असला तरी ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागली नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे.



